आई शिवणकाम करणारी... वडील रिक्षाचालक.. संसाराचा गाडा ओढण्याचं काम चालू होतं. मात्र अंधारात जसा काजवा चमकावा त्याप्रमाणे संभाजी चौधरी यांची एकुलती एक कन्या चैताली हिने शिवणकामातून काही नवीन करायचं मनावर घेतलं आणि आयुष्याचं रुपडंच पालटलं. महिलांची आवडती नऊवारी रेडिमेड करून देत त्याला आधुनिकतेचा साज दिला. त्यामुळे देशातच नव्हे तर विदेशात त्यांची नऊवारी पोहोचली आहे. हे काम त्यांनी वयाच्या अवघ्या २१ च्या वर्षी हाती घेतले. नऊवारीच्या नखरेल अदाकारांनी अनेक लावण्या सम्राज्ञिनिंनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ऐटबाज, डौलदार व मराठमोळ्या या परंपरेचं लेणं अशी हि नऊवारी साडी आता फॅशन म्हणून नावारूपाला आली आहे. काळ बदलला तशी महिलांची आवड-निवडही बदलली. याच परंपरेचा वारसा पुढे जपण्याचे काम या 'नऊवारी नार' ने केलेले आहे.